Friday, March 5, 2021

मोगलीच्या जंगलात - पेंच अभयारण्यात

डिसेंबर २०२० मध्ये पुन्हा एकदा जंगलात जायचा विचार सुरू झाला. यावेळी श्राव्याला पहिल्यांदाच जंगलात घेऊन जायचं म्हणून वेगळा उत्साहही होता. आदित्य, गिरिजा, प्रणवची ठरलेली एक जंगल सहल, २०२० च्या लॉकडाऊनमुळे घडली नव्हती. आम्ही त्यांना चिडवत होतो, आम्हाला सोडून जाणार होतात त्यामुळे लॉकडाऊन झाला, म्हणून आम्ही असताना जाऊया :). शेवटी ओंकार बापट (Wildlife Unlimited) बरोबर पेंचला जायचं नक्की झालं आणि त्याप्रमाणे कोण कोण येणार आणि वेळेत तिकीटे काढणं वगैरे विचार, चर्चा सुरू झाल्या.

जानेवारी २०२१ संपता संपता आदित्य, गिरिजा, प्रणव, श्राव्या, पार्थ, मी, सत्यजित आणि संहिता असे सगळे जायचं ठरवलं.

फेब्रुवारी २०२१ मध्ये पुन्हा एकदा कोविडला उधाण आलं आणि लॉकडाऊनचं सावट आलं. लॉकडाऊन होणार का नाही, कुठे होऊ शकतो, आम्हाला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात जायचं असल्याने कोविड चाचण्या कराव्या लागणार का नाही असे सगळे प्रश्न निघायच्या ४ दिवस आधी उभे रहायला लागले. संहिताला आयत्यावेळी काही कारणानी येता येणार नाही असं कळलं. शेवटी २ दिवस आधी कोविड चाचण्या करून, सगळ्यांच्या प्रकृती उत्तम आहेत याचे दाखले घेऊन, आम्ही २६ फेब्रुवारीला पुण्याहून पेंचला जायला निघालो.


२६ फेब्रुवारी २०२१

दुपारी १२ च्या सुमारास पुणे विमानतळावर पोहोचलो. श्राव्याचा दुसरा विमानप्रवास, पण कळत्या वयातला पहिलाच. कोविडमुळे तिला इकडे जाऊ नको, कशाला हात लावू नको वगैरे हे कसं आणि किती वेळा समजवावं लागेल, सगळा वेळ मास्क लावेल का, एकाच ठिकाणी काही तास गप्पांच्या व्यतिरिक्त काहीच न करता कशी बसेल असे प्रश्न होते. ती एरवीच समजूतदारपणे वागते, पण तरीही मोकळ्या जागेत फिरू नकोस, नवीन दिसलेल्या कुठल्याच वस्तू आणि नवीन माणसं यांच्यापासून लांबच रहा हे तिनी तरी किती आणि कसं समजून घ्यावं असंही वाटत होतं. विमानतळावर फिरणाऱ्या पायऱ्यांवर (escalator) आणि थोडं फार मोकळ्या जागेत फिरता आल्यानी ती खुशीत होती. विमानात जाताना आजूबाजूची एक दोन विमाने दिसली, ' केवढं मोठं आहे बघ ' हे तिचे शब्द आणि हावभाव बघायला मजा आली :). विमानात बसल्यावर, पट्टा लावून घेतला, आणि त्या माहिती पत्रकावर काय काय छापलं आहे हे मन लावून बघितलं. खिडकीत बसून बाहेरची सगळी मजा बघत होती, त्यातला ढगांचा कापूस तिला खूपच आवडला. विमानात मागच्याच खुर्चीत एक छोटी मुलगी होती, मग काय विमानात त्यांचा वेळ मजेत आणि त्या मुलीच्या आईचा आणि आमचा वेळ त्या दोघींना लांबून खेळा, बोला हे सांगण्यात कसा गेला कळलं नाही. नागपूरला पोचता पोचता आता पुन्हा थोडावेळ पट्टा लावून खुर्चीत बसावं लागणार आहे आणि ते पट्ट्याचं चित्र लागल्यापासून ते चित्र दिसेनासं होईपर्यंत बसायचं आहे हे मात्र श्राव्याला लवकर पटलं. आपलं सामान, फिरणाऱ्या पट्ट्यावरून जसं आपापलं फिरत गेलं तसंच ते परत आलेलं तिनी बघितलं. ते सामान विमानापर्यंत ने आण करणाऱ्या छोट्या गाड्या आणि माणसांची ने आण करणाऱ्या बसगाड्या बघितल्या. विमानातून उतरल्यावर सामानाच्या ट्रॉलीमधे बसून बाहेरपर्यंत येताना तिला गंमत वाटली. एकुणात विमान प्रवास छान पार पडला.

दुपारी ३:३० च्या सुमारास नागपुरात ओंकारला भेटून पेंचला जायला निघालो. रस्त्याच्या बाजूचं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश, दोन्हीकडचं जंगल बघत आलो. एकीकडे मावळतीचा सूर्य आणि दुसरीकडे पौर्णिमाचा लख्ख गोल चंद्र उगवताना दिसत होता. पेंचकडे वळताना पांढऱ्या शुभ्र बगळ्यांनी भरलेलं एक झाड दिसलं. ते बघत पुढे येताना झाडामागून चंद्र डोकावला. अप्रतिम दृश्य होतं.

६:३० च्या सुमारास 'पेंच टायगर होम' या हॉटेलमध्ये पोहोचलो. ७-८ खोल्यांचं हॉटेल, अगदी गेट जवळ, उत्तम खोल्या, बाहेर मोकळी जागा, मोठी गच्ची, आणि आजूबाजूला जिकडे बघावं तिकडे लांबपर्यंत दिसणारं जंगल. जंगलातून रातवा / Night jar, चितळ वगैरेंचे आवाज येत होते. थोडावेळ गप्पा मारून जेवायला गेलो. जेवणही उत्तम होतं.

पार्थनी श्राव्याला Rudyard Kipling यांच्या The jungle book या पुस्तकातल्या मोगलीची गोष्ट सांगितली. आपल्याला भालू, बगिरा, शेरखान वगैरे दिसू शकतील सांगितलं.

दुसऱ्या दिवशी, २७ तारखेचा दिवस श्राव्याला फार दगदग नको म्हणून मोकळा ठेवला होता. पण बाकीच्यांनी कशाला झोपून दिवस वाया घालवायचा म्हणून सकाळची एक सफारी करायची ठरली.

अनपेक्षितपणे ठरलेल्या या सफारीच्या आनंदात सगळे लवकरच झोपले. :)


२७ फेब्रुवारी २०२१

आजच्या सफारीला ओंकार, आदित्य, सत्यजित, पार्थ आणि प्रणव तेलीया बफर झोनमध्ये गेले. जंगलात येऊनही मी आज बरीच उशिरा उठले. खोलीचं दार उघडुन समोर जंगलाचा देखावा दिसला, रंगीबेरंगी झाडं, पक्षांच्या किलबिलाटानी सकाळ प्रसन्न झाली :).

सकाळीच काही प्रकारचे पक्षी दिसले.

सातभाई / Jungle warbler, साळुंकी / Jungle myna, Rufous treepie, बुलबुल / Red vented bulbul, वेडा राघू / Green bee eater, ब्राह्मणी मैना, कोकीळ / Asian Koel

बाजूच्या झाडांवर खारीची पळापळ चालू होती.

पक्षी बघत निवांत हा अनुभव लिहायचं ठरवलं आणि थोडंसं लिहून होईपर्यंत पार्थचा कॉल आला, त्यांची ID proofs वाटेत कुठेतरी पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि हॉटेलच्या परिसरात आहेत का ते बघायला मी बाहेर पडले. शोधत होते ते काही सापडलं नाही पण आणखीन काही पक्षी मात्र दिसले.

नीलपंखी / Indian roller, तांबट / Coppersmith barbet, कावळा / Crow, चिमणी / Sparrow, Indian robin, दयाळ / Magpie robin

थोड्या वेळात सगळे सफारी करून आले. त्यांना वानर / Langoor, चितळ / Spotted deer आणि नीलगाय असे प्राणी आणि Plum headed parakeet, Alexandrine parakeet आणि पोपटांचे थवे, सातभाई / Warblers, धनेश / Indian grey hornbill, White eyed buzzard, Rufous woodpecker, Spot billed duck आणि काही प्रकारची बदकं दिसली होती.

नाश्ता करायला बसलो तेव्हा Second Evening च्या दुर्गाप्रसाद यांचा कॉल आला. त्यांना ती ID proofs सापडली होती आणि एकावर नंबर असल्याने त्यांनी कॉल केला होता. थोड्या वेळात ती हातात मिळाली आणि हुश्श झालं.

संध्याकाळी निघून ६-८ च्या रात्रीच्या सफारीला खवासा गेटमधून तेलिया बफर झोनमध्ये गेलो. ड्रायव्हर रामला तिकडे जातानाच रस्त्यात एक मुलगा भेटला. त्यानी आत्ताच या भागातून डरकाळी ऐकू आल्याचं सांगितलं. पहिल्याच दिवशी वाघ दिसण्याची आशा बळावली. फॉरेस्ट गाईड मेश्रामला घेऊन आम्ही जंगलात शिरलो. चितळांच्या एक दोन कळपांनी आमचं जंगलात स्वागत केलं. मोकळ्या जंगलाचा वास, बहरलेली काटेसावर, त्यावर असलेली मधमाशांची पोळी आणि घोंगवणाऱ्या अगणित माशा, पिवळा केशरी हिरवा अशा रंगांनी रंगलेले ऐन आणि कुसुम, साग, गराडी, घोस्ट ट्री म्हणून ओळखला जाणारा पांढऱ्या खोडाचा वृक्ष, असे अनेक ओळखीचे आणि अनोळखी वृक्ष, थंड वारा या सगळ्यात दिवसाचा सगळा शीण क्षणार्धात घालवायची ताकद आहे असं जाणवलं.

तळ्याजवळ काही हालचाल आहे का बघायला गेलो तेव्हा तळ्यात Little cormorant, Darter, चांदवा, इतर काही बदकाचे प्रकार असे पाण्याजवळचे पक्षी दिसले. जंगलात आणखीन आत जाईपर्यंत अंधार व्हायला लागला होता आणि वाघाचा माग काढत फिरत असताना दुसऱ्या एका गाईडकडून माहिती मिळाली, जिथे आम्ही काही मिनिटांपुर्वी होतो तिकडेच काहीतरी आवाज आले होते. त्यांनी कुणालातरी वाघीण दिसल्याचं सांगितलं. वाघ बघण्याची आणि ती आलेल्या पाहुण्यांना दिसावा अशी तीव्र इच्छा असलेल्या आमच्या ड्रायव्हरने त्या वळणांच्या रस्त्यावरून शक्य तेवढं लवकर नेऊन त्याचं गाडी चालवण्याचं कौशल्य दाखवून दिलं. आम्ही त्या जागेवर पोहोचेपर्यंत काळोख आणखी वाढला होता. काही तीक्ष्ण नजरेच्या लोकांना त्या अंधारातही वाघिणीची हालचाल आणि ती पुढे जात असल्याचं दिसत होतं. ती वाघीण पुढे कुठे बाहेर येऊन दर्शन देईल यासाठी गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबल्या होत्या. गाड्यांची संख्या बऱ्यापैकी वाढत होती. मधेच काही गाड्यांमधून ' दिसली दिसली, तिकडे चालली आहे ' असं काही ऐकू आलं की पुन्हा सगळ्या गाड्या त्या दिशेनी निघायच्या. या सगळ्या आवाजांनी ती वाघीण नक्कीच अस्वस्थ झाली असणार, पण एवढ्या गाड्या तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या असतानाही ती बऱ्याच वेगाने पुढे कुठेतरी बाहेर येऊन काही लोकांनाच दिसत होती. वाघाचा एवढा आकार आणि वजन असूनही केवढा वेग आणि हलकी पावलं यामुळे त्याचा पत्ता लागणं किती अवघड आहे याचा अनुभव आला. तरीही बराच वेळ माग काढल्यावर कुठेतरी गाड्यांच्या दिव्यांच्या उजेडात आम्हाला ती रस्ता ओलांडताना दिसली. कितीही वेळा बघितलं तरीही पुन्हा पुन्हा दिसावा असं वाटत रहावं असा राजबिंडा प्राणी. आयत्या वेळी ठरलेल्या या सफारीचं सार्थक झाल्यासारखं वाटलं :D आणखीन थोडा वेळ माग काढत पुन्हा एकदा असाच रस्ता ओलांडताना दर्शन देऊन ती झुडुपात नाहीशी झाली. बऱ्याच गाड्या अजून बराच काळ ती नाहीशी झालेल्या जागेकडे बघत ती पुन्हा दिसण्याची आशा करत असताना, आम्ही आणखी काही दिसतंय का बघायला दुसरीकडे वळलो.

पौर्णिमेच्या जवळपास, रात्री जंगलात फिरण्याची मजा काही निराळीच असते. इतका वेळ गाड्यांच्या दिव्यांची रोषणाई बघितल्यानंतर शांत चंद्रप्रकाशात फिरणं हे अत्यंत सुखद होतं. आता आम्ही थोड्या दाट आणि कदाचित कमी वर्दळीच्या जंगलात आलो होतो. इथली झाडं रस्त्याच्या बरीच जवळ होती आणि जास्ती प्रमाणातही होती. इथले जुने रस्ते तितकेसे मळलेले दिसत नव्हते आणि काही प्रमाणात गाड्या जाऊनच ते इतके वापरण्यासारखे राहिले आहेत असं गाईडने सांगितलं.

या रस्त्यातच Eurasian thick knee नावाचा पक्षी दिसला, पुढे एका सशानी उड्या मारत रस्ता ओलांडला. थोड्या अंतरावर गव्यानी पाडलेलं छोटं झाड रस्ता अडवून पडलं होतं, ते बाजूला करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. थोड्याच वेळात हॉटेलमध्ये परत येऊन, जेवून झोपलो.




२८ फेब्रुवारी २०२१

सकाळी ५:१५ ला उठून चहा कॉफी वगैरे पिऊन, हॉटेलमधून नाश्ता बरोबर घेऊन निघालो. हॉटेल गेटजवळच असल्याने चालतच जायचं होतं. ६ वाजेपर्यंत टुरिया गेटपाशी गेलो. गाड्या तयारच होत्या. ६:३० च्या सुमारास टुरिया गेट मधून कोअर झोनमध्ये शिरलो. आज काय काय दिसेल, आजपण वाघ दिसेल का अशा उत्सुकतेनी आत शिरलो.

आम्ही या भागाच्या मध्यापर्यंत पोचलो तोपर्यंत चितळांचे, वानरांचे आणि रानडुक्करांचे पिल्लं असलेले कळप, सांबर दिसले होते.

काही पक्षीही दिसले.

कोतवाल / Black drongo, कोतवाल / White bellied drongo, घुबड / Jungle owlet, बदक / Gadwall, घुबड / Indian scops owl, गरुड / Grey headed fish eagle, गिधाड / White rumped vulture, गिधाड / Indian vulture, मोर / Peacock, टिटवी / Lapwing, सुतार / Flameback woodpecker, धनेश / Grey hornbill, BOP

बराच वेळ जंगलातली झाडं आणि त्यावर काही पक्षी दिसत आहेत का हे बघत फिरलो कारण वाघ दिसण्याची आशा जवळजवळ मावळली होती. भिर्रा नावाचं हिरव्या पिवळ्या बारीक compound प्रकारची पाने असलेलं एक झाड बऱ्याच प्रमाणात दिसत होतं. त्यात डास निरोधक गुणधर्म असल्याचं गाईडने सांगितलं. ही झाडे बऱ्याच प्रमाणात लावलेली दिसत होती. अशी वेगवेगळी माहिती घेत बरंच फिरल्यावर, ३-४ गाड्यांना वाघ दिसल्याचं आणि थोड्या वेळात आणखी कुठेतरी बिबट्या दिसल्याचं कळलं. बिबट्याच्या ठिकाणी पोहोचताना बऱ्याच गाड्या उलट्या येत होत्या, आम्ही सोडून बहुतेक सगळे बिबट्याचं दर्शन घेऊन त्यातच समाधान मानून परतत होते. शेवटी एकदाचं आम्हालाही त्याचं दर्शन घडलं. आदित्य, प्रणव, ओंकार आणि गिरिजा आधीपासूनच त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत थांबले होते.

तिथून निघून पुन्हा मध्यभागी असलेल्या कॅम्पपाशी आलो. नाश्ता करून परत निघालो. सफारीची वेळ संपत आली असताना एकदा मगाशी दिसला तिथे वाघ दिसतोय का बघू म्हणून अजून एका वळणावर वळलो. बहुदा सगळ्याच गाड्या आता एका ठिकाणी होत्या आणि ' वाघ कुठेतरी आत जाऊन झोपला आहे ' एवढंच सगळे एकमेकांना सांगत होते. थोडा वेळ मागे पुढे केल्यावर वाघाची शेपूट मग शरीर मग चेहरा दिसला :). निघायची वेळ अगदी जवळ आलेली असताना ती पाटदेव नावाची वाघीण उठून शेजारच्या बेचक्यातून आमच्या विरुद्ध दिशेला चालती होत दिसेनाशी झाली.

एकुणात सकाळची सफारी इतकी चांगली झाल्याने पुढच्या सफारीबद्दलची उत्सुकता आणि अपेक्षा वाढली.

थोडी विश्रांती घेऊन दुपारी २ ला जेवायला गेलो. ३ वाजायच्या सुमारास टुरिया गेटपाशी गेलो आणि १५-२० मिनिटांत पुन्हा जंगलात शिरलो. सकाळचाच route मिळाल्याने लगेच सकाळी वाघीण दिसलेल्या ठिकाणाजवळ जाता आलं नाही पण आमचा ड्रायव्हर रामचंद आणि गाईड कृष्णा यांनी सकाळी पाहिलेल्या जंगली कुत्रे आणि बिबटे यांबद्दल माहिती सांगितली, त्या अनुषंगाने कुत्रे आणि वाघ यांबद्दलचे त्यांचे अनुभव आणि याच जंगलातल्या गोष्टी सांगितल्या. मधे मधे अशा गोष्टी ऐकत, त्यातल्या त्यात कमी सापडणारे सांबर, नीलगाय, रानडुक्कर आणि बाकी रोजचेच वाटायला लागलेले चितळ, वानर वगैरे प्राणी बघत बराच वेळ जंगलात फिरलो, पण आज दुपारी जंगल एकूणच शांत, रुक्ष वाटत होतं. पक्षांचा किलबिलाट नाही, वारा नाही, एकही पान पडतानासुद्धा आवाज करत नसावं इतकी भकास शांतता अनुभवली. Bison camp पाशी गेलो तेव्हा पाण्याच्या जवळपास हेच प्राणी दिसले, त्याबरोबर River tern आणि खंड्या / Pied kingfisher वगैरे पक्षी दिसले. पण प्राणीसुद्धा रोजचा दिनक्रम पार पाडत दिवस संपण्याची वाट बघत असावेत. एकूण सगळ्या निरुत्साही वातावरणात दिवस मावळला.



१ मार्च २०२१

पहाटे ५:३० ला निघून खुर्सापार गेट मधून ६:१५ च्या सुमारास जंगलात गेलो. अंधाराला डोळे सरावेपर्यंत पुरेसा उजेड झाला. थोड्याच अंतरावर २ भले मोठे गवे दिसले. जंगलाच्या काही भागात पसरलेले गारागोटीसारखे किंवा गारगोटीचे लहान मोठे दगड सुंदर दिसत होते. आजही Euresian thick knee, हळद्या / Golden oriole, नीलपंखी वगैरे पक्षी आणि रोज दिसणारे प्राणी यांव्यतिरिक्त फार कोणाचीच कसलीच हालचाल नव्हती. काही भाग सोडता हे जंगलही काल संध्याकाळसारखं निरुत्साही भकास वाटत होतं.

आमचा ड्रायव्हर मुबश्शिर आणि गाईड संजू यांनी आत शिरतानाच तिथे गेल्या एक दोन दिवसात वाघ दिसल्याचं सांगितलं आणि रस्त्यावरच्या खुणा शोधायला सुरुवात केली. थोड्या वेळात वेगवेगळ्या ठिकाणांहून अलार्म कॉल ऐकू यायला लागले. या भागात महाराष्ट्र, मध्य प्रदेश या दोन्ही बाजूंच्या जंगलातून वाघ येत जात असल्याने नक्की कोणता कुठे दिसेल हे आत्ता सांगता येत नाही असं ते म्हणाले. तिथे गेल्या काही दिवसात दिसलेल्या काही नर आणि मादी वाघांची नावं त्यांनी सांगितली. वाटेत एका ठिकाणी आम्ही आलो त्याच्या दिशेनी उलट गेलेले पंज्याचे ठसे आणि विष्ठा दिसली, ती वाघाची असावी असं त्यांच्या आपापसातल्या बोलण्यातून वाटलं. आपापसात बोलताना ते तिथल्या प्रादेशिक गोंड आणि बाकीवेळ हिंदी भाषेत बोलत होते.

एकूण याही सफारीमध्ये वाघ दिसणार नाही आणि गेल्या दोन सफाऱ्यांमध्ये दिसलेल्या तुरळक दर्शनातच समाधान मानावं लागणार अशी चिन्हं दिसू लागली. थोड्याच वेळात फॉरेस्ट कॅम्पमधे नाश्ता करून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

प्राणी - चितळ, सांबर, वानर, गवा

पक्षी - सातभाई, Rufous tree pie, Indian roller, Greater racket tailed drongo, Rose ringed parakeet, Plum headed parakeet, Buzzard, White throated kingfisher, मोर, रान कोंबडा / Red junglefowl, सुतार / Flameback woodpecker, वारकरी / Common coot, Pond heron, Darter, Spot billed duck, Hoopoe

सकाळच्या थोड्या निराशाजनक सफारीनंतर दुपारीतरी मोठं जनावर दिसावं अशी आशा बाळगून २:३० चा सुमारास तेलीया गेटकडे जायला निघालो. गाडीत काहीतरी बिघाड वाटल्यानी थोडा वेळ ते बघण्यात गेला आणि ३:१५ च्या सुमारास जंगलात निघालो. या सफारीला आमच्याबरोबर ड्रायव्हर दिनेश आणि गाईड मनोहर होते.

या भागात आधल्याच दिवशी रात्रीच्या सफारीला मादी आणि दोन बच्चे असे ३ बिबटे आणि वाघही दिसल्याचं ओंकारला कळलं होतं. बिबट्याच्या २ पिल्लांपैकी एक काळा असल्याचं कळलं होतं. आम्हाला वाघ नाही दिसला तरी ठीक आहे पण तो काळा बिबट्या दिसायला हवा अशी इच्छा होती कारण काळा बिबट्या दिसणं हे अगदीच दुर्मिळ असतं. गाईडने सांगितलं की वाघीण आणि तिचे बच्चे असे ६:१५ च्या सुमारास जवळच्या डोंगरावर दिसले होते, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत काहीतरी दिसेल अशी आशा होती.

जंगलाच्या या भागामध्ये गराडीची झाडं बऱ्याच प्रमाणात आहेत. तसंच ऐन म्हणजे तिथले लोक ज्याला साजा किंवा Crocodile bark tree म्हणतात आणि मोह आणि कुसुम ही या ऋतूत अत्यंत मोहक पिवळ्या लाल केशरी हिरव्या पानांची झाडंही बऱ्याच प्रमाणात आहेत. सकाळपेक्षा आत्ता थोडं दाट जंगल, रंग आणि वारा या सगळ्यामुळे या जंगलाला जिवंतपणा होता, प्रसन्न वाटत होतं.

या सफारीसाठी आज आमच्या दोनच गाड्या होत्या, त्यामुळे अलार्म कॉल शिवाय कुठे वाघ, बिबटे दिसत आहेत हे कळायला मार्ग नव्हता. दुसऱ्या गाडीत आमच्याबरोबर रात्र सफारीला असलेला गाईड मेश्राम होता.

दुपारी ४:३०-५ पर्यंत ऊनच असल्याने प्राणी बाहेर पडतच नाहीत असा आत्तापर्यंतचा अनुभव होता. त्यामुळे आम्ही पक्षी, झाडं, एकूण वातावरण याचा आनंद घेत फिरत होतो. ६ वाजून गेले, दोन तीन वेळा आमच्या गाड्या काही ठिकाणी एकमेकांसमोर आल्या. त्यावेळचे अलार्म कॉल्स ऐकून त्या त्या दिशेनी वेगवेगळ्या भागात फिरत होतो. मधेच एक फॉरेस्ट पेट्रोलिंग करणारे कोणीतरी सायकल वरून जात होते त्यांनी गावातल्या कोणीतरी वाघ बघितल्याचं सांगितलं आणि आम्ही पुन्हा त्या बाजूला निघालो. शेवटी आता जंगलाबाहेर पडायची वेळ होत आली असल्याने पुन्हा आमच्या गाड्या एका ठिकाणी भेटल्यावर आमच्या गाईड्सनी कुठली गाडी कुठे फिरवून एकदा बघून येऊ वगैरे ठरवलं आणि आम्ही दोन वेगळ्या दिशांना निघालो.

आता जर काही दिसलं नाही तर सलग तिसऱ्या सफारीला हरीण, सांबर, नीलगाय, रान कोंबडा, तित्तर सोडता काही दिसलं नव्हतं. बांबूच्या वनातून जात होतो. बांबूच्या वनात थंडाव्याला म्हणून वाघ, बिबट्या ही मोठी जनावरं येऊन बसतात, त्यामुळे इथे आतातरी काहीतरी दिसावं अशी इच्छा होती. शेवटी दिसलं, Cat family मधला प्रतिनिधी म्हणून, बाकी काही नाही तर एक रान मांजर / Jungle cat दिसलं :). अंधार पडायला लागल्याने आणि त्याच्या क्लृप्ती / छलावरणामुळे ( camouflage ) त्याचे फोटो काही मिळाले नाहीत पण काहीतरी नवीन दिसलं याचा आनंद झाला. गमतीत आम्ही त्यालाच 'आता तुझ्या कुटुंबातल्या इतरांनाही यायला सांग की' असं म्हणून स्वतःशीच हसलो :).

तिथून पुढे निघालो, सगळे डोळ्यात तेल घालून बाजूच्या अंधारत चाललेल्या जंगलात काही हालचाल दिसत आहे का हे बघत होतो. गिरिजा जंगलात यायला लागल्यापासून तिची कालची आणि आज सकाळची अशा लागोपाठ दोन सफाऱ्या पहिल्यांदाच एकही वाघ किंवा तत्सम प्राणी न दिसता संपल्या होत्या. त्यामुळे आता तिसरीही तशीच झाली याचं कुठेतरी वाईट वाटत होतं. श्राव्या आता खूप वेळ एकाच गाडीत बसून, हळू आवाजात बोल ऐकून कंटाळली होती. गिरिजा तिची करमणूक करत आता हॉटेलमध्ये गेल्यावर मॅगी खायची आहे याचा आनंद मानून घेत होती. आणि अचानक मला कोणीतरी झाडात उभं आहे असं दिसलं, मी हातवारे करून गाईड आणि ड्रायव्हरला थांबायला सांगेपर्यंत पार्थलाही तो दिसला :D बिबट्या दिसला. सगळ्यांनी बघेपर्यंत गाईड आणि ड्रायव्हरने अजून मागे बघा म्हणून दाखवलं आणि तो सुंदर काळा कुळकुळीत बिबट्या दिसला. मागून तिसरा बिबट्याही आला असं ते म्हणाले पण मला तो तिसरा काही दिसला नाही, बाकी दोन्ही बिबटे काही सेकंदात आतल्या जंगलात निघून गेले. आमच्या गाईडला काळयाचा मस्त व्हिडिओ मिळाला. आमची दुसरी गाडी काही सेकंदात तिथे पोहोचली पण त्यांना मात्र बिबटे दिसले नाहीत. पुढच्या काही मिनिटांत आम्ही अत्यानंदात जंगलातून बाहेर पडलो. :) :)

आज जंगलातली शेवटची रात्र असल्याने थोडा वेळ तरी गप्पा मारत बसायचं असं ठरलं आणि आम्ही आवरून, जेवून १२:३० पर्यंत ओंकारकडून जंगलातले किस्से ऐकत बसलो.


२ मार्च २०२१

आज सकाळी ५:३० ला बाहेर पडून ६ वाजायच्या आधीच टुरिया गेटपाशी पोहोचलो. गेटजवळ हॉटेल असल्याने आज निवांतपणा होता. आमची गाडी आत जाण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर थांबली होती आणि ड्रायव्हर आल्यावर त्यांनी काहीतरी तयारी करताना गिअरचा अख्खा दांडा बाहेर आला. झालं, आता नवीन गाडी कुठली आणि कधी येणार असं वाटलं पण ५ मिनिटांत दुसरी गाडी हजर झाली. ठरलेल्या वेळेला गाड्या गेटमधून आत सोडल्या गेल्या. आज आमच्याबरोबर ड्रायव्हर तेगचंद आणि गाईड अनिल होते. त्यांनी आमची कितवी सफारी, काय काय कुठे दिसलं वगैरे चौकशी केली आणि पहिल्या सफारी पासून एवढं काही दिसलं म्हणून नशीबवान आहात म्हणाले. 'बघुया वाघ मिळाला तर' असं म्हणून कुठल्या रूटवरून कुठे जातोय वगैरे सांगत त्यांनी गाडी हाकायला सुरुवात केली. सुरुवातीलाच एका ठिकाणी कॉल्स ऐकू आले. ते आवाज आमच्यापासून लांब जात आहेत असा लक्षात आल्यावर आम्ही पुढे निघालो पण आमच्यामागून आलेल्या किंवा समोरून आलेल्या गाड्या तिथेच वाट बघत थांबल्या. आम्ही थोडे पुढे जाऊन थांबलो होतो. बराच वेळ मागून एकही गाडी न आल्यानी काही घडलं का काय बघायला मागे फिरलो पण काहीच नवीन घडलं नव्हतं. वेगवेगळ्या भागात फिरून आलेल्या गाड्या भेटत होत्या आणि सगळे एकमेकांचे पडलेले चेहरे बघत पुढे जात होते.

कर्माझिरी गेटमधून आलेल्या एक दोन गाईड्सनी त्या बाजूला कॉल्स होते पण पुढे काहीच न घडल्यानी ते टुरिया गेट जवळच्या भागात आल्याचं सांगितलं. कर्माझिरी गेट टुरिया गेटपासून लांब असल्याने सहसा टुरिया मधून गाड्या तिकडे जात नाहीत पण परवाच एकाच गाडीला तिकडे वाघीण आणि बच्चे दिसल्याचं आम्हाला माहिती होतं. आमच्या गाईडने आम्हाला दोनदा वाघ बघायला मिळाला असल्याने त्या बाजूला जाऊन बघुया म्हणलं, आम्ही तयारच होतो.

आम्ही त्या गेटपासून साधारण ५०० मीटरवर असताना चितळ आणि वानरांचे आवाज यायला लागले. वाघ नक्की जवळपास असणार आणि आज नक्कीच दिसणार याची खात्री वाटायला लागली. ही आमची शेवटची सफारी असल्याने, आजही वाघ दिसला तर सोन्याहून पिवळं होणार होतं. त्याच वेळी फॉरेस्टची एक पांढरी गाडी गेटमधून आली होती आणि तीही कॉल्स ऐकून आमच्या जवळ थांबली होती. दोनच मिनिटांत समोरच्या नाल्यात वाघीण बाहेर आली. ही वाघीण रूनिझुनी म्हणून ओळखली जाते कारण ती रूनिझुनी नावाच्या रस्त्यावर दिसते. ती खूपच बुजरी असल्याने फारशी समोर येत नाही. तिने आमच्या गाड्या बघून नाल्यातूनच पुढे चालायला सुरुवात केली. जवळून बघता येईल अशा तऱ्हेने आमच्या ड्रायव्हरने गाडी वळवून मागे आणली. आम्ही थांबेपर्यंत ती वाघीण निवांत झाडाखाली बसून आमच्याकडे बघत होती. गाईडनी ती आम्हाला हुलकावणी देण्यासाठी तिथे बसलेली असावी असं सांगितलं. बाजूला चरत असलेल्या चितळांना अजून तिचा पत्ता लागला नव्हता. आम्ही तिला बघत असतानाच त्यांनाही शोध लागला आणि ते अलार्म कॉल्स द्यायला लागले. आमच्याबरोबर थांबलेली ती गाडी, झाडाखाली बसलेली वाघीण बघून पुढे निघून गेली होती. आमची दुसरी गाडी अजून इथे आली नव्हती आणि वाघीण एवढी निवांत बसलेली असूनही त्यांना इकडे बोलवायची काही सोय नव्हती. त्यांनाही आज जवळून वाघ बघायला मिळायला हवा अशी इच्छा होती आणि बाकी जंगलात कुठेही अजून तरी वाघ दिसल्याचं ऐकण्यात आलं नव्हतं. असे विचार चालू असतानाच वाघीण उठली आणि आली त्या दिशेनी पण रस्ता ओलांडायच्या हेतूनी निघाली. आम्ही गाडी हळूहळू मागे घेईपर्यंत ती रस्ता ओलांडून पलीकडच्या झाडीत शिरलीही. आम्ही ती दिसेनाशी झालेली बघत असतानाच आमची दुसरी गाडी तिथे पोचली. काहीच दिसत नाही तर दिसलेल्या कोतवालाचे (Racket tailed drongo) फोटो काढत ते काही मिनिटांनी उशिरा पोहोचले होते. कालच त्यांचा काळा बिबट्या काही सेकंदाने हुकला होता, आज वाघही हुकला का काय असं वाटलं :(.

वाघीण आता पुढे कुठेतरी बाहेर निघेल अशा आशेत ते वळले आणि काही सेकंदातच ती बाहेर येऊन त्यांच्या समोरून काही मिनिटे रस्त्यावरून चालली. आम्ही नेमके मागेच थांबून ती कुठून निघेल हा विचार करत होतो. आम्ही पुढे पोहोचेपर्यंत गाडीच्या आवाजानी ती पुन्हा एकदा झाडीत शिरली. आम्ही आणखीन पुढच्या वळणावर जाऊन थांबल्यानंतर सावकाश बाहेर आली, तिचा भाग दर्शवण्यासाठी खुणा करत (territory marking) ती फिरत होती हे लक्षात आलं. आमच्यासमोरून रस्ता ओलांडत ती पुन्हा पलीकडच्या जंगलात शिरली. एव्हाना सगळ्यांनाच तिचे उत्तम फोटो मिळाल्याने आणि इतक्यांदा तिनी दर्शन दिल्यामुळे सगळे खुश होते. इथून आम्ही पुन्हा परतीच्या मार्गावर, ती कुठे चालली आहे हे बघत जात असताना आणखीन एक गाडी येऊन पुढच्या वळणावर थांबली होती पण त्यांना कदाचित ती लांबूनच दिसली किंवा दिसलीच नाही आणि जंगलात आतच जात राहिली. तिला घाबरून बाहेर आलेला चितळांचा कळप तेवढा बाहेर आलेला दिसला. काही मिनिटांत आतून वानरांचे ( Langoor) कॉल्स ऐकू आले आणि आता काही ती बाहेर येणार नाही म्हणून आम्ही सगळेच टुरिया भागाच्या मध्यावर असलेल्या कँपकडे यायला निघालो.

आजची सफारी छानच झालेली होती आणि सगळ्यांनाच वाघ दिसल्याने सगळेच खुशीत होतो. श्राव्यानी या कॅम्प मधे उभ्या केलेल्या मोगलीच्या पुतळ्याशी गप्पा मारून फोटो काढून घेतला आणि त्याला अच्छा म्हणून आम्ही निघायची तयारी केली.

नाश्ता करून आजूबाजूला बघत निघालो तर बरीच गिधाडं घिरट्या घालताना दिसली. परवाच इथे गिधाडं बघितलेली असल्याने नवीन काही नव्हतं पण जमिनीलगत उडणाऱ्या गिधाडांची संख्या बरीच आहे असं लक्षात आलं आणि नक्कीच काहीतरी शिकार असणार हे आम्ही ताडलं. कॅम्पपासून १०० मीटरवर, बाजूच्या गवतात चितळाची शिकार पडलेली होती आणि त्यावर ही गिधाडं आणि कावळे ताव मारत होते. इतक्यात बाजूनी कोल्हे / Jackals येताना दिसले. इतक्या सफाऱ्यांमध्ये न दिसलेला हा प्राणीही दिसला.

ओंकारबरोबर आमच्यातले काही जण पूर्वीही जंगलात फिरायला गेलेले होते आणि दरवेळी सगळेच छान अनुभव घेऊन परतलो होतो. तो सगळी व्यवस्था उत्तम करतोच आणि त्याचे अनुभव ऐकणं ही वेगळी मजा असते. आमच्या फिरण्यात लोकडाऊनमुळे पडलेल्या मोठ्ठ्या खंडानंतर मोगलीच्या जंगलाची ही सफर फारच आनंददायी आणि अविस्मरणीय झाली.




प्राण्या-पक्षांची एकत्रित यादी 

पक्षी 

  1. सातभाई / Jungle warbler 
  2. साळुंकी / Jungle myna 
  3. Rufous treepie 
  4. बुलबुल / Red vented bulbul 
  5. वेडा राघू / Green bee eater 
  6. ब्राह्मणी मैना 
  7. कोकीळ / Asian Koel 
  8. नीलपंखी / Indian roller 
  9. तांबट / Coppersmith barbet 
  10. कावळा / Crow 
  11. चिमणी / Sparrow 
  12. चिरक / Indian robin 
  13. दयाळ / Oriental magpie robin 
  14. पोपट / Plum headed parakeet 
  15. पोपट / Alexandrine parakeet 
  16. पोपट / Rose ringed parakeet 
  17. गिधाड / White rumped vulture 
  18. गिधाड / Indian vulture 
  19. घुबड / Jungle owlet 
  20. घुबड / Indian scops owl 
  21. गरुड / Grey headed fish eagle 
  22. White eyed buzzard 
  23. Eurasian thick knee 
  24. कोतवाल / Black drongo 
  25. कोतवाल / White bellied drongo 
  26. कोतवाल / Greater racket tailed drongo 
  27. सुतार / Rufous woodpecker 
  28. सुतार / Flameback woodpecker 
  29. धनेश / Indian grey hornbill 
  30. हळद्या / Golden oriole 
  31. हुप्पो / Hoopoe 
  32. रान कोंबडा / Red junglefowl 
  33. मोर / Peacock / Peafowl 
  34. टिटवी / Lapwing 
  35. बदक / Spot billed duck 
  36. बदक / Gadwall 
  37. वारकरी / चांदवा / Common coot 
  38. Little cormorant 
  39. Darter 
  40. River tern 
  41. बगळा / Pond heron 
  42. बगळा / Egret 
  43. खंड्या / White throated kingfisher 
  44. खंड्या / Common Kingfisher / Small Blue Kingfisher 
  45. खंड्या / Pied kingfisher 
सस्तन प्राणी 

  1. बिबट्या / Leopard 
  2. काळा बिबट्या / Black leopard / Black panther 
  3. वाघ / Tiger 
  4. रान मांजर / Jungle cat 
  5. कोल्हा / Jackal 
  6. वानर / Langoor 
  7. माकड / Macaque 
  8. चितळ / Spotted deer 
  9. सांबर / Sambar deer 
  10. नीलगाय 
  11. रानससा / Hare 
  12. गवा / Bison 
  13. रानडुक्कर / Wild boar 
  14. खार 
  15. उंदीर / Rat

8 comments:

  1. Wow Himinga.... masta watala wachun....

    ReplyDelete
  2. हिमांगी, छान आणि उत्कंठावर्धक लिहिले आहेस. रोज काहीतरी लिहीत राहा म्हणजे नंतर एकत्र करून छान लेख तयार होईल

    ReplyDelete
  3. Beautifully expressed ... I felt as if I'm in the safari looking for tiger

    ReplyDelete
  4. Thank you so much for encouraging feedback! :)

    ReplyDelete
  5. Enjoyed safaris with Shravya and you!

    Imagined Shravya's cute expressions too!

    ReplyDelete
  6. अभिजित आवळसकरJuly 9, 2021 at 9:58 PM

    हिमांगी, फार छान वर्णन केले आहेस. संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं केलंस ! ��

    ReplyDelete