Saturday, December 4, 2021

वाघांच्या राजधानीत...

काही महिन्यांच्या उपासानंतर जंगलात फिरायला जायचं ठरलं. आज उद्यात तारखा ठरवू म्हणत माणसं ठरेपर्यंत दोन आठवडे गेलेच पण १६-१९ नोव्हेंबरला भाचेकंपनीसकट १० जण ताडोबाला जायला गोळा झालो. 


ताडोबा आणि अंधारी अभयारण्याचं  (Tadoba and Andhari Tiger Reserve - TATR) मुख्य वनक्षेत्र (core) हे ६२५.४ स्क्वेअर किलोमीटरचं आहे. आजूबाजूचं काही (buffer) क्षेत्र मिळून एकूण क्षेत्र साधारण १७२७ स्क्वेअर किलोमीटरचं आहे. कोअर भागात जाण्यासाठी कोलारा, नवेगाव, मोहारली गावातून दारे आहेत. बफर भागात जाण्यासाठी, कोलारा, पळसगाव, अलिझंझा ही प्रवेशद्वारे आहेत. आणखीही काही प्रवेशद्वारे आहेत पण वरील प्रवेशद्वारे प्रामुख्याने वापरली जातात. कदाचित या दारांपासून एका वेळी आत जाऊ शकणाऱ्या गाड्या जास्ती असल्याने किंवा या ठिकाणी पोहोचणं त्या मानानी सोपं असल्यामुळे तसं असावं. 
 

आम्ही कोलारा गेटजवळ राहणार होतो. निघायच्या आधल्याच दिवशी त्याच बाजुला वाघानी काही लोकांना जखमी केल्याची बातमी ऐकली. खुद्द रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर तिथल्या मालकाकडून त्याच दिवशी सकाळी असाच काहीतरी अपघात झाल्याचं कळलं. काहीवेळा वाघ जंगलाच्या बाजूच्या शेतांमध्ये डुकरांची, गुरांची शिकार करायला येतात. तसाच बहुदा एक वाघ आला होता, रानडुकराची शिकार केली होती, बघ्यांची गर्दी झाल्याने तो बिथरला आणि काही लोक जखमी झाले. इतरांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं ' वाघानी हल्ला केला / गुरेढोरे मारली यामागे काही ना काही कारण असतं आणि त्यात चूक कोणा एकाचीच नसते '. इथे वाघांचा माणसांशी संघर्ष असा नाही पण ताडोबात वाघांची संख्या तशी चांगली आहे आणि जंगलक्षेत्र मात्र त्या प्रमाणात वाढू शकत नाही. एका वाघाला राहण्यासाठी साधारण ६०-१०० स्क्वे. किमी. इतका भाग लागतो तर वाघीण १५-२० स्क्वे. किमी. एवढ्या भागात वावरते. तसंच शिकारीसाठी प्राण्यांची संख्याही त्या त्या भागात वाघांच्या प्रमाणात असावी लागते. अशा कारणांमुळे ताडोबामध्ये कोअर प्रमाणे बफर भागातही वाघ दिसण्याची चांगल्यापैकी शक्यता आहे. 

 

 

१६ नोव्हेंबर 


आम्ही ११:३० च्या सुमारास नागपुरातून निघालो. वाटेत कुठेतरी अचानक उंट दिसला. ताडोबाजवळ वाटेत खूप कापूस आणि तुरीची शेतं दिसली. बरीच पळसाची लागवड दिसली. एका शेताजवळच्या साचलेल्या तळ्यात एक चित्रबलाकांचा थवा होता. प्रवासाची सुरुवात तर मस्त झाली.

दुपारी १:४५ च्या सुमारास छावा कोलारा रिसॉर्टमध्ये पोहोचलो. आलोक, छावाचा मालक दारातच भेटला. निवांत मोकळी जागा आणि परिसर बघूनच छान वाटलं. दुपारी बाहेर बसता यावा म्हणून हट्स आहेत, टायर झाडाला बांधून केलेले झोपाळे आहेत. स्वच्छ मोठ्या खोल्या, प्रशस्त डायनिंग हॉल आहे. त्यात लावलेले विविध फोटो बघून आपल्याला यातलं काय काय दिसेल अशी उत्सुकता चाळवली.  सामान खोल्यांमध्ये ठेवून लगेचच जेवायला गेलो. जेवण उत्तम असल्यामुळे मुलांचीही छान सोय झाली. मुलांना खेळायला आणि फिरायलाही भरपूर जागा असल्यानं ती आपापली मजेत खेळू शकली.


खरंतर मुलांना दगदग नको म्हणून हा दिवस मोकळाच ठेवलेला होता, पण जंगलाच्या एवढ्या जवळ पोहोचल्यानंतर स्वस्थ बसू तर ते आम्ही कसले :). नाईट सफारीला जागा आहे का विचारून आमच्यातले ६ जणं जायला तयार झाले. 

 

पळसगाव बफरमध्ये ७ ते १० अशा सफारीला निघालो. आजूबाजूला शेतं असलेला रस्ता, गार वारा, मोकळ्या हवेत घमघमणारा गवताचा वास, पौर्णिमेच्या जवळपासचा लख्ख चंद्र यांनी झकास सुरुवात झाली.


कुठलेही प्राणी पक्षी कितीही वेळा कुठल्याही सफारीमध्ये दिसले असले तरीही पुढच्या वेळी फिरताना वाटणारी उत्सुकता मात्र नेहमी कायम असते असा माझा अनुभव आहे. आमच्याबरोबर यावेळी सारंग गाईड आणि आकाश ड्रायव्हर होते. नेमका आधल्याच दिवशी पाऊस झालेला असल्याने फार काही दिसण्याची अपेक्षा नव्हती पण सारंगनी ताडोबाची छान ओळख करून दिली. काही वेळानी अपेक्षेपेक्षा बरेच प्राणी दिसले. रानससा, नीलगाय, चितळ, सांबर, रानडुक्करांचे १-२ कळप आणि मी यापूर्वी न बघितलेले उदमांजर असे प्राणी, रातवा आणि टिटवी हे पक्षीही दिसले. ४० वर्षांनी एकदाच फुलून वाळून जाणारे बांबू, पहिल्यांदाच बघितले. हे वाळलेले बांबू वनखात्याकडून आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये सरपणासाठी विकून टाकले जातात.

 

सारंगने कोअरमध्ये अजूनही काही आदिवासी गावे आहेत, त्यापैकी कारवा गाव या बाजूला आहे असं सांगितलं. वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अशा उरलेल्या गावांचे स्थलांतर करण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचंही सांगितले.



१७ नोव्हेंबर

आजपासून आमच्या ठरलेल्या सफारींची सुरुवात झाली. पहिल्या सफारीला सकाळी ६:३० वाजता कोलारा गेट मधून कोअरमध्ये शिरलो. आत शिरल्या शिरल्या उजवीकडे काही छोटी छोटी कोनाडेवजा मंदिरं बांधल्यासारखी दिसली. प्रत्येकात एक वाघाचा पुतळा होता. गाईडने सांगितलं, ती सर्व वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या माणसांची स्मारके आहेत. 

एवढंच बोलणं होऊन आजूबाजूला बघेपर्यंत पावसानी हजेरी लावली. कालपासून ढगाळ वातावरण होतंच आणि पाऊस पडू नये अशी आशाही होती. पण जंगलात प्राण्या - पक्षांऐवजी पाऊसच स्वागत करेल अशी अजिबातच अपेक्षा नव्हती. नेमकंच पहिल्याच दिवशी मी आणि पार्थ थंडीसाठीही काहीच न घेता निघालो होतो. त्यात पाऊस आल्यावर, त्यापासून श्राव्या, कॅमेरा, दुर्बीण कसं लपवायचं हे सुधरण्यात काही मिनिटं गेली. 'पावसात जंगलात फिरण्याची मजा वेगळीच असते' या गजानन गाईडच्या वाक्यावरून पाऊस आल्यानी सफारी रद्द होणार नाही हे कळलं आणि बरं वाटलं. थोडंच अंतर पुढे गेल्यावर मात्र पाऊस गायब झाला.

 
ताडोबामध्ये गवताळ प्रदेश, घनदाट बांबूवन,आणि मोठाल्या
पानझडी वृक्षांचं जंगल आहे. वृक्षांमध्ये प्रामुख्याने साग, ऐन, गराडी, मोवई, जांभूळ, मोहा, भेरा, तेंदू इ. आहेत. वृक्ष आणि बांबूच्या वनातून प्राणी दिसणं तितकसं सोपं नसल्याचं आणि एकूणच मी बघितलेल्या इतर जंगलातील प्राण्यांपेक्षा इथे प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्याही हालचाली फारच आवाजरहीत असल्याचं थोड्याच वेळात लक्षात आलं. इतकं स्तब्ध जंगल मी पहिल्यांदाच अनुभवलं.

 

आधीच पाऊस पडल्याने आणि अजूनही ढगांनी सूर्याला डोकावायला जागा दिलेली नसल्याने कोणीही वन्यजीव दिसण्याची आशा कमीच होती. पण त्यातल्या त्यात एखादा शिकारी पक्षी किंवा घुबड झाडांच्या खोबणीत किंवा शेंड्यावर दिसतो का म्हणून मी नेहमीप्रमाणे झाडांकडे बघत होते. एकदम एका झाडाच्या शेंड्यावर एक मोठा पक्षी बसलेला दिसला, मी गाडी मागे घ्यायला सांगितली. खूप उत्साहानी सगळेजण बघत होतो आणि पक्षी स्पष्ट दिसला तेव्हा वाट्टेल ते पक्षी वाट्टेल तिथे जाऊन बसतात असं झालं :) कारण त्या उंच झाडाच्या शेंड्याजवळ एक मोर बसला होता. असो. 

तरीही पहिल्या तासाभरातच चितळांचे २-३ कळप आणि त्यातले फार सुंदर शिंगे असलेले लहान मोठे नर चितळ दिसले. नरांनाच शिंगे असतात, माद्यांना नाही.

कोलारा गेटमधून आत गेल्यावर पांढरपौनी, जामनी, जामुनबोडी आणि ताडोबा अशा ४ तलावांजवळून चकरा होतात.

जामनी तलावाजवळ झाडं वेलींमुळे एक छोटासा तलाव वेगळा झाल्यासारखा दिसतो. त्यात पांढरी कमळे फुलली होती. तिथेच चितळांचा १ कळप, काही पाण्याजवळ दिसणारे पक्षी दिसले. त्याच्या समोरच्या बाजूला, रस्त्यापलिकडे, घनदाट बांबू आणि मागे वृक्ष होते, त्यांच्या मधून दुसरा कळप चरताना दिसत होता.  सकाळच्या प्रहरी ही जागा खूपच रम्य वाटत होती.

 

येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या आणि कोणालाही वाघ दिसलेला नाही हे प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट होतं. पुढे फिरताना सांबर, नीलगाय, पोपट, रान कोंबडी, मोर, सातभाई, गरुड, वेडा राघू, काळा कोतवाल, कावळे इ. दिसले. 

 

आम्ही पुढे ताडोबा तलावाजवळ गेलो. हा इथला सगळ्यात मोठा तलाव आहे. प्रचंड शांत निवांत परिसर आहे. इथे वेगवेगळे बगळे, चट्टरी वनघुबड, काळा अवाक / काळा कंकर,
पाणकावळा, पांढरपोट्या कोतवाल,  तुरेबाज व्याध / झेंडोरी गरुड इ. पक्षी दिसले. 

चट्टरी वनघुबड मी पहिल्यांदाच बघितलं आणि फारच आवडलं. त्याच्या पिसांवरची गडद केशरी, राखाडी, पांढऱ्या रंगांची कोरीव नक्षीसारखी रचना
खूपच मोहक वाटली.

याच तलावाजवळ नंतरच्या अनेक चकरांमध्ये आणखीनही वेगवेगळे प्राणी पक्षी दिसले पण ते नंतर येईलच.

 

इथे वाघ आणि इतर प्राणीही नाहीत याची खात्री झाल्यावर आणि साधारण सफारीचा अर्धा वेळ संपत आलेला असल्याने नुसतंच जंगल बघायला जरा लांब जायचं ठरलं. 


ताडोबा तलावाजवळून निघताना वाटेत तारुबाचं मंदिर दिसतं. तारू हा एकेकाळी आदिवासी मुख्य होता आणि वाघाच्या हल्ल्यात तो गेल्यानंतर त्याचं स्मारक बांधलं गेलं, मग पूजा होऊ लागली. इथले आदिवासी तारुबा हा देव मानतात आणि त्याचवरून ताडोबा नाव आलेलं असल्याच्या गोष्टी ऐकत आम्ही तिथून निघालो. मोहारली गेटच्या बाजूला तेलिया तलाव, अंधारी नदी आणि वाघडोह आहे त्या दिशेला लागलो.

 

इकडचं जंगल आणखीन थोडं दाट वाटत होतं, कदाचित लहान रस्ते असल्यामुळे असेल किंवा इथे येईपर्यंत गवताळ भागच जास्त बघितल्यामुळे असेल, पण खरंच, अजून जंगलात आत आत आल्यासारखं जाणवलं. इकडेही तो ४० वर्षांतून एकदाच फुललेला बांबू आणि फुलून वाळून गेलेला बांबू दोन्हीही बघायला मिळाले. कोअर भागात ६०% बांबूवन असल्याचं कळलं. प्रचंड मोठी जांभळाची झाडं दिसली, ज्यांचा प्रत्येकी घेर साधारण २-३ माणसांनी हात धरून जेवढा होईल तेवढा असेल.

इथूनच पुढे जंगलात अचानक डांबरी रस्ता लागला. त्याबद्दल गाईडने सांगितलं, तो जुना नागपूर - चंद्रपूर रस्ता आहे आणि काही वर्षांपुर्वीपर्यंत हा ST चा नेहमीचा रस्ता होता. अनेकदा वाघ रस्त्यात बसलेले असल्याने ते उठण्याची वाट बघत बसगाड्या २-२ तास इथे थांबून असायच्या. पुढे हा भागही कोअरमधे आल्यानी हा
बसमार्ग बंद झाला. आता एवढं ऐकल्यावर मग हे वाघ आजच कुठे गेले असं वाटलंच. :)

 

याच रस्त्यावर आणि आजूबाजूच्या जंगलात, विटांनी बांधलेले आणि काही नव्याने डागडुजी केलेले खांब दिसले. हे दिशादर्शक खांब असून साधारण १०-११ फूट उंचीचे आहेत. त्यावर U आकाराचा दगड असून तो पुढच्या खांबाची योग्य दिशा कळण्यासाठी बसवलेला आहे. काही खांबांवर रंगानी आकडे लिहिलेले दिसले, ते मागच्या पुढच्या खांबांचे संदर्भ असावेत. हे खांब कोणी बांधले याबद्दल मतांतरे दिसतात. या भागात इस. १५व्या शतकात गोंड राजे राज्य करत होते. त्यांनीच हे बांधलेले आहेत अशी एक समजूत आहे तर ब्रिटिशांच्या काळात हे बांधले गेले असं एका अभ्यासावरुन आढळतं. अजूनही बरेच खांब डागडुजीशिवाय खंबीर उभे असलेले दिसतात. 

याच भागातील पळसगाव हे अजूनही कोअरमध्ये असलेलं आणखीन एक गाव. इथे गोंड आदिवासी राहतात.

 

अशी बरीच माहिती सांगता सांगता गाईड एकदम उभा राहिला आणि समोर रस्त्यावर वाघ दिसल्याचं सांगितलं. झालं, सगळ्यांनाच नवा हुरूप आला. थोडं पुढे गेल्यावर बाजूच्या जंगलात एक १ sub adult नर बच्चा ( साधारण २+ वर्षांचा बछडा) दिसला. तो बुजरा होता. रस्ता ओलांडताना बहुदा गाडीच्या आवाजाने तो पुन्हा जंगलात शिरला होता. काही मिनिटे त्याला बघत थांबलो. श्राव्याला
तो दाखवला आणि नक्की दिसला ना म्हणून परत विचारलं तर हळू आवाजात ' जंगलात कासव, ससा नि कोल्हा, वाघोबा त्यांच्याशी खोटं बोलला... ' असा कुठल्यातरी गोष्टीतल्या गाण्याचा संदर्भ सांगत, 'तोच वाघोबा आहे तो' असं म्हणली :). तिला इतक्या पटकन आठवलेल्या या संदर्भाचं मला खूपच कौतुक वाटलं. इतक्यात त्या वाघाने एकदा फिस्कारून दाखवल्यावर आम्ही थोडे पुढे गेलो. परत थांबून मागे बघितल्यावर, तो वळून निवांत बसलेला दिसला. त्याला थोडावेळ बघून आम्ही तिथून परतीच्या मार्गाला लागलो.
 

वाटेत गाड्या भेटल्यावर आणखीनही कुठे कुठे वाघ दिसल्याचं कळलं. आपली दुसरी गाडी त्या लोकांमध्ये असावी असं वाटलं पण नंतर कळलं की त्यांची वेळ अजूनही यायची होती. जिथे वाघ दिसला त्या पांढरपौनीजवळ चक्कर मारून जंगलातून बाहेर पडलो.

 

जंगलातल्या अशा फिरण्यात 'शांतता राखणं' हा वन्यजीवांना आपला त्रास होऊ नये आणि आपल्याला त्यांना बघता यावं यांसाठी महत्वाचा मुद्दा असतो. आमच्याबरोबर ४ लहान मुलं असूनही आम्हाला त्यांना 'शांत बसा' हे एकदा जीप जंगलात शिरल्यावर कधीच सांगावं लागलं नाही. पण एवढे तास शांत बसल्यानंतर, दोन सफारींमधला सगळा वेळ मुलांनी धुडगूस घालून वसूल केला :).  

--- 


प्रत्येक व्याघ्र प्रकल्पामध्ये प्रत्येक गेटपासून आत जाणाऱ्या गाड्यांची संख्या ठराविक असते, ती त्या त्या प्रकल्पाच्या क्षेत्राप्रमाणे बदलते. प्रत्येक गेट मधून जाणाऱ्या ठराविकच गाड्या असतात आणि त्यांची आलटून पालटून आत जाण्याची पाळी येते. तशाच प्रकारे, प्रत्येक गेटमधून जाणारे गाईड्स ठरलेले असतात आणि त्यांची आलटून पालटून पाळी येईल तसे ते गाड्यांबरोबर येतात. याचं साधं कारण म्हणजे सगळ्या गाड्या आणि गाईड्स यांना आत जाण्याची समान संधी मिळावी.

दुपारी दीडच्या सुमारास जेवून तयारी करून पुन्हा बाहेर पडलो. दुपारची सफारी कोअरमध्येच २ ते ६ वेळात होती. आमच्याबरोबर आत्ता पुन्हा सकाळी असलेले गजनान गाईड होते. ऊन बऱ्यापैकी असल्याने आणि साधारण ४:३० पर्यंत प्राणी फार बाहेर पडत नसल्याने तसं सगळं निवांत होतं.  चट्टरी वनघुबड, भारद्वाज, बगळे, शिंजिर / सूर्यपक्षी, हळद्या वगैरे पक्षी दिसले. बरीच फुलपाखरं दिसली. जामनी तलावाजवळ एका ओढ्याजवळ एक छोटी मगर दिसली, नवीन प्राणी बघायला मिळाला.  

फिरता फिरता एकदा पंचधारा विसावा केंद्रात गेलो. नाश्ता करण्यासाठी जागा, स्वच्छतागृह वगैरे सोयी इथे आहेत. ताडोबा अंधारी प्रकल्प, त्यातल्या जागा, प्रवेशद्वारे, कोअर, बफर भाग वगैरे दाखवणारा नकाशा, इथले वृक्ष, गवतांचे प्रकार, प्राणी, पक्षी, अन्नसाखळी तसेच दिशादर्शक खांब वगैरेची थोडक्यात माहितीही इथे एका बाजूच्या खोलीच्या भिंतींवर लावलेली आहे. दुसऱ्या बाजूला नाश्त्यासाठी एक छत घातलेली पण बाजूने उघडी अशी जागा आहे. या विसाव्याच्या दारावर कागदावर छापून लावलेली ' येता जाता दार बंद करावे ' अशी पाटी आहे. आत शिरतानाच आम्ही ती वाचली आणि पुणेरी पाटी अशी टिप्पणी केली गेली. गाईडने सांगितलं की साधारण १५-२० दिवसांपूर्वी फिरत फिरत विसाव्यात आलेल्या गाड्या आणि लोकं होती. बाजूच्या वन विभागाच्या कॉलोनीमधल्या घरांच्या बाजूने अचानक माया वाघीण रस्त्यावर आली होती आणि विसाव्याच्या दिशेने निवांत चालत येत होती. अर्थातच ते बघितल्यावर आत असलेल्या लोकांची गडबड उडली असणार आणि गाईडनी दार बंद केलं असणार. पण तेव्हापासून ही पाटी दारावर लावलेली आहे :) आणि त्याचं कटाक्षाने पालन केलं जातंय.

 

पुढे पुन्हा एकदा ताडोबा तलावाकडे चक्कर मारून आलो. किनारा तसा मोठा असल्याने बराच वेळ काही ना काही दिसत होतं. एक मोठ्ठी मगर निवांत ऊन खात पहुडलेली होती. बाजूला काळा अवाक, पांढरे बगळे दिसले. 

 

 

थोडं पुढे पुन्हा ते घुबड दिसलं. घुबडांच्या जागा ठरलेल्या असतात त्यामुळे प्रत्येकवेळी ते बघायचंच असा अलिखित नियमच होता. त्यात ती इतक्या अंधाऱ्या ठिकाणी असतात किंवा झाडाशी इतकी एकरूप झालेली दिसतात की दरवेळी बघितल्यावर काहीतरी वेगळ रूप दिसलं असं होऊ शकतं. मला घुबड बघायला फार आवडतं त्यामुळे मी प्रत्येक फेरीमध्ये आवर्जून एकदातरी दुर्बीण लावून त्याला बघितलं.

 

टेकडीवरच्या जामुनबोडी तलावावर एकदा चक्कर मारून आलो. जामुनबोडी तलावात काही चांदवे, बदक, थोरला धोबी, वेडा राघू वगैरे पक्षी आणि काही चितळं दिसली. 

 

जाता येता मधे मधे मोठमोठाली भुत्याची झाडं उभी होती. पेंचला बघितलेली झाडं अगदीच पांढरी फटक रंगाची होती पण या ऋतूत त्यांची साल निघायला लागलेली आणि त्यामुळे गुलाबीसर आणि हिरवट असे रंग उठाव घेताना दिसत होते. एका वर्षात या झाडाची साल पांढरी, गुलाबी, हिरवी या तीन वेगवेगळ्या रंगांची दिसते. या टेकडीवरून खाली उतरताना पुन्हा गवताळ प्रदेश आणि तुरळक झाडं आहेत. इथे सद्ध्या प्रचंड वाढलेल्या भूतगांज्या नावाच्या गवताचे कापून काढलेले ढीगच्या ढीग पसरलेले होते. हे गवत बाकी कुठल्याच गवताला वाढू देत नाही आणि प्राण्यांना हे खाण्यालायक नसतं, त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी दिवसेंदिवस ते काढण्याचं काम करत होते.

 

इथे पुन्हा एकदा गरुड दिसला, यावेळी मात्र तो एका शिकारीवर ताव मारत होता. बहुदा सांबर असावं पण लांब असल्याने नक्की कळलं नाही. थोडा वेळ त्याला बघून, शिकार किती जुनी असेल असे अंदाज लावत गप्पा झाल्या. 

आज अजून कोणाला कुठे कुठे वाघ दिसला होता, त्या जागांवर बऱ्याचदा फिरून काही न दिसल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. अचानक शेवटच्या रस्त्याला लागलो आणि समोर ४ तरी गाड्या झाडीत बघत उभ्या होत्या. पुन्हा एकदा व्याघ्र दर्शन होणार, का आम्ही एखाद्या मिनिटानी इकडे तिकडे झालो तर झाडीतल्या अंधारामुळे ते हुकणार, अशी उत्सुकता वाटली. 

 

पण एवढी संधी समोर असताना बघण्याचा प्रयत्न तर केलाच पाहिजे म्हणून गाड्या मागे पुढे फिरायला लागल्या होत्या.. कोणीतरी, रुद्र नावाचा वाघ बघितला होता आणि गाड्यांच्या आवाजाने तो बांबू वनातूनच पलीकडे जातोय असंही सांगितलं होतं. सगळे श्वास रोखून हालचाल दिसते का पाहत होते. एवढ्यात ५ मिनिटे नक्कीच गेली असणार, आणि एकदम आमच्याच गाडीसमोर झाडीतल्या अंधारात अगदीच ३-४ सेकंद दर्शन देऊन तो गायब झाला. कदाचित एवढ्या जवळून (२५ -३० फुटांवर) दिसल्याने किंवा अंधारात आकृती दिसल्याने किंवा तो खरच तितका प्रचंड असल्याने पण 'अबब केवढा मोठा वाघ' असं झालं खरं. असा सफारी संपता संपता अनपेक्षितपणे वाघ दिसल्यावर मजा आली. 
 

पुन्हा एकदा आमच्या दुसऱ्या गाडीला आणि मागून आलेल्या अनेक गाड्यांना मात्र तो दिसलाच नाही. सगळ्यांना हुलकावणी देऊन रस्ता बदलून तो पलीकडच्या जंगलात शिरल्याचं वानर आणि चितळांच्या आवाजावरून कळलं आणि मग आम्ही जंगलातून बाहेर जायला निघालो.

 


१८ नोव्हेंबर 

 

साधारणतः, ओंकार बफरमध्ये काही आणि कोअरमध्ये काही अशाच सफारी ठरवतो ज्यायोगे जंगलाचे वेगवेगळे भाग बघितले जातात आणि वन्यजीव दिसण्याची शक्यता वाढते. आजची कोअरमधली शेवटची सफारी होती. आमच्याबरोबर मिथुन गाईड आणि दशरथ चालक होते.

 

आज दिवस लख्ख उजाडणार होता. लांबवर पसरलेल्या शेतांच्या मागे केशरी सूर्य हळू हळू डोकं वर काढत होता. आजूबाजूचे ढग वेगवेगळे रंग घेऊन सर्वत्र पसरत होते. अशा वातावरणात ताजेतवाने व्हायला क्षणही पुरतो.

 

गेटपाशी पोहोचलो तेव्हा अजून गेट उघडायला १५ मिनिटे होती. या बाजूची शेवटची सफारी म्हणून काय खरेदी करायची ती आत्ताच करायची असं ठरलं. छावामध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या संतोष जाधव यांचं तिथे एक दुकान आहे. तिथून टीशर्ट, टोपी इ. वस्तू घेतल्या आणि गाडीत जाऊन आत जायची वाट बघत बसलो. ६:३० च्या ठोक्याला गाड्या आत निघाल्या.

 

आत गेल्यावर काही अंतरातच एक मोठा गवा दिसला. तिच्या गडद तपकिरी रंगावरून ती मादी होती असं कळलं. मग अजून नीट बघितल्यावर झाडीत अजून मादी आणि एखादा काळा नर गवा असे दिसले. पुढे जामुनबोडीच्या रस्त्याजवळ पोचलो तेव्हा लांब एक गाडी उभी दिसली. काय दिसतंय बघितल्यावर, साधारण काल जिथे गरुड शिकारीवर ताव मारत होता, तीच शिकार चट्टामट्टा करायला रानकुत्रे आलेले होते. तो एकमार्गी रस्ता असल्यानी आम्हाला लगेच जवळ जाऊन बघता आलं नाही पण दुर्बिणीतून कुत्र्यांची पळापळ दिसली. खरंतर साधारणपणे रानकुत्रे मोठ्ठ्या कळपांनी फिरतात पण इथे दोनच कुत्रे आहेत असं गाईडने सांगितलं.

 

जामनी तलावाजवळ गवतात कुठेतरी पहुडलेली ४ चितळ, ४ सांबर दिसली. पांढरपौनी तलावाजवळ गाड्या होत्या पण तिथेही बाकी काही हालचाल दिसली नाही. मात्र तिथे भेटलेल्या एका मित्राने त्यांना नवेगाव गेटमधून आल्या आल्याच वाघ दिसल्याचं सांगितलं. याच तलावाजवळ, थोड्या वेळानी, पहिल्यांदाच ३-४ वानरं दिसली. जामुनबोडी तलावात निवांत डुंबणारे ४ सांबर आणि तिथेच बाजूला एक मादी आणि पाडस असे ६ सांबर दिसले.

 

मग परत एकदा ताडोबा तलावाकडे वळलो. आज इकडे येता जाता खूप पक्षी दिसले, कुदळ्या / पांढरा शराटी, चट्टरी घुबडांची जोडी, वंचक, गाय बगळा, पांढरा बगळा, पोपट, वेडा राघू, साळुंकी, ब्राह्मणी मैना, बझर्ड, गरुड, शिक्रा, ससाणा, हुदहुद्या, कबुतर, हरियाल, नीलपंखी, बदक इ. एक मगर पोहताना दिसली.

आज बऱ्यापैकी फिरफिर फिरलो. पांढरपौनी, जामनी, ताडोबा तलाव, काळा आंबा, बाकी पाणवठे, पण एकूण जंगल शांतच होत. कदाचित आज एकदम बरंच ऊन आल्याने प्राणी फार बाहेरच आले नाहीत. पण त्याआधीही आज प्राण्यांचा दुष्काळच होता. एकूणच ताडोबात शाकाहारी प्राण्यांची संख्या कमी वाटली किंवा ती पर्यटन क्षेत्रात तरी निश्चित कमी आहे. (जंगलाच्या एकूण क्षेत्राच्या २०% भागच पर्यटनासाठी खुला असतो.)

 

शेवटी एकदा जामनी तलावाजवळ चक्कर मारली, लांबच्या गवतात थोडी सतर्क सांबरे दिसली म्हणून थांबलो पण त्यांनीही मग निवांत पडायचं ठरवलं आणि आम्ही परतीचा रस्ता पकडला.

---

दुपारी अलिझंझा बफरमध्ये गेलो. इथलं जंगल जरा जास्त उत्साहवर्धक होतं. बांबू आणि साग खूपच कमी असल्याने रुक्षपणा कमी आहे. शिवाय हे दोन टप्प्यात आहे, डोंगर आणि खाली उतरून माळरान. उंचसखल भाग आणि झाडं यामुळे थोडीफार विविधता दिसते. डोंगराचा खडा चढ / उतार करताना लांबपर्यंतचा परिसर दिसतो. विहंगम दृश्य!

 

आज आमच्याबरोबर बाळकृष्ण नावाचा गाईड होता. त्यांनी ताडोबाच्या कुठल्या कुठल्या भागांतून तिकडे वाघ येतात, नुकतेच कुठले दिसले आहेत, मग आधल्याच दिवशी जंगल बंद असल्याने कसा माग काढत जाणं अवघड होतं, शिकार झाल्यानंतर कसा रोजच वाघ दिसत होता याच्या जुन्या गोष्टी सांगितल्या. 

 

आम्ही डोंगर उतरून खाली गेलो. माळरानात वाटेत दोन गुराखी भेटले. शेळ्या हाकत ते बाजूच्या जंगलातून रस्त्यावर येत होते. आजूबाजूच्या गावातील लोकांना गुरं चारण्यासाठी बफर भागात यायला परवानगी आहे. वाघ शेळ्यांवर हल्ला करत नसल्याने ते निवांत होते. गाईडने त्यांना परवाच या भागात दिसलेल्या छोटा मटकासुर नावाच्या वाघाबद्दल विचारलं. 'त्यानी कालच कुठेतरी गायी मारल्याचं आणि कोअर बाजूला गेल्याचं' त्यांनी सांगितलं.

ताडोब्यात सगळ्याच भागांमधे ठिकठिकाणी Giant Wood Spiders ची जाळी आणि त्यात असलेली कोळीण (मादी) दिसली. साधारण तळहाताएवढा तिचा अंगविस्तार असतो. उठावदार काळ्या पिवळ्या रंगाचा हा कोळी सुंदर दिसतो.  

शक्य तेवढ्या लांबच्या टोकापर्यंत आम्ही फेरफटका मारून आलो. या बाजूला शांत जंगलाखेरिज एक sand piper आणि काही चिखलातले क्षार शोषत बसलेली (mud puddling) फुलपाखरे तेवढी दिसली. 

या जंगलातली शांतता मात्र मनाला शांत करणारी होती. कोअरमध्ये अनुभवलेली निशब्द भेसूर स्तब्धता त्यात नव्हती. 

इथूनच फिरून साधारण सगळ्याच गाड्या आता जंगलाजवळच्या मंदिरापाशी एकत्र आल्या. आमच्या गाईडला, मागे कुठल्यातरी गाडीला बंद पडल्यानी मदत लागणार असल्याचं कळलं आणि आम्हाला त्या मंदिरापाशी सोडून ते गेले. इथे बरीच वानरं होती. खायला काढायला नको म्हणून थोडं थांबलो. थोडंसं काढून खाईपर्यंत एका मादी वानर आणि तिच्या बच्चानी उडी मारून जीप वर बसत अन्वयला घाबरवलं, तो धडपडला. फार लागलं नाही पण तो अगदीच हिरमुसला. 

 

बाकी गाड्या आणि आमची दुसरी गाडी थोडा वेळ थांबून पुढे गेले. आमची गाडी आल्यावर आम्ही पुन्हा डोंगर चढून वरच्या जंगलात जायचं ठरलं. आजूबाजूचं तसं दाट जंगल, उंच झाडं आणि त्यावर चढलेल्या राक्षस वेली बघत आम्ही पुढे गेलो. तो जीवघेणा चढ चढून वर आलो तोच पुन्हा निरोप आला, तीच मगाचची गाडी पुन्हा बंद पडली होती. आम्ही पुन्हा डोंगर उतरून देवळापाशी गेलो. आता ती गाडी दुरुस्त होत नाही आणि दुसरी गाडी मागवावी असा निष्कर्ष काढून तिथून निघालो. त्या गाडीतली लोकं आणि आम्हीही किमान तासभर या दुरुस्ती दुरुस्ती खेळण्यात गेल्याने वैतागायला लागलो होतो. जेव्हा प्राणी बाहेर पडायची वेळ झाली होती तेव्हाही आम्ही गाड्या दुरुस्तीमधे अडकलो होतो. शेवटी त्या गाडीला तिथेच सोडून आम्ही परत डोंगर चढून वर आलो. 

 

कुठलेतरी पाणवठे, ठराविक जागा बघत बरेच फिरलो. आमची दुसरी गाडी काही आम्हाला पुन्हा भेटली नाही. ते डोंगर चढायला दुसऱ्या मार्गाने गेले असणार त्यामुळे लांबून येतील आणि आपल्याला भेटले नसतील असा एकूण चर्चेवरून निष्कर्ष झाला होता. 

 

वाटेत एक नर नीलगाय दिसला. निळा काळया रंगांचा, तुकतुकीत कांतीचा, शिंगे असलेला तो नर राजबिंडा दिसत होता. एरवी फार वेळा नर कधीच दिसले नव्हते पण गेल्या काही सफारींमधे बऱ्याचदा एकेकटे फिरत असलेले नर नीलगाय दिसले. 

 

एका वळणावर एक प्रचंड गवा दिसला. गाईडने सांगितलं की कळपात दुसऱ्या गव्याशी मारामारीत कळपाचं नेतेपद हरून तो कळपातून बाहेर पडलेला आहे. त्या मारामारीत तो चांगलाच दमलेला आहे. हे ऐकल्यावर, त्याला हरवणारा नर काय ताकदीचा असेल याची कल्पनाच केलेली बरी, असं वाटलं. तो एकटाच चरत फिरत चालत होता. आम्ही थोडावेळ त्याला बघून पुढे निघालो, अगदी ५० मीटर गेलो असू, तोही तोपर्यंत पुढे सरकून पुढच्या झाडाखाली थांबला होता. साधारण आम्ही त्या गव्यासमोर यायला आणि गाईडने 'इथेच थांबवा, थोडी गाडी मागे घ्या' वगैरे म्हणायला एकच वेळ आली. अजून थोडी गाडी मागे घेऊन गव्याच्या अगदी तोंडाचा फोटो कोणाला हवा आहे हे काही मला कळेना. बरं तेवढ्या जवळ उभे आहोत हे गव्याला आवडलं नाही किंवा त्याने बाजूने जाता जाता चुकूनही गाडीला धक्का लागला तरी गाडी हलेल एवढी त्याची शक्ती असणारच. पण चालकाने गाडी मागे न घेता पुढेच थांबवली आणि मला हुश्श झालं. आपण नेमके काय बघायला थांबलो आहोत हे कळायच्या आत बाजूच्या फांदीवर एका पक्षानी एकदम पंख फुगवून अंगाचा फुगा केल्यासारखं केलं आणि त्यामुळे तो गवा माझ्या इतकाच दचकून रस्ता ओलांडून पलीकडे जाऊन थांबला.. गवा लांब गेल्याचं बघून जरा बरं वाटून पक्षाकडे बघावं तर तेवढ्यात तोही उडून लांब जाऊन बसला. मगाचपासून बऱ्याचदा दिसलेला मोहोळ घार नावाचा एक पक्षी, बहुतेक वेळा कॅमेरा त्याच्यावर रोखला की उडून जात होता. तोच असावा असं वाटलं, पण हा एक गरुड होता. हा तर आमची नजरही रोखली जायच्या आत पसार झाला होता.

पुढे गेल्यावर आणखीन एक असाच कळपातून बाहेर पडलेला गवा दिसला, याची दृष्टी थोडी अधू झालेली असल्याचं कळलं. 

 

आता काळोख पसरायला सुरुवात झाली होती, काहीही नवीन दिसण्याची आशा आमच्या गाईडलाही नव्हतीच असं दिसत होतं. आधल्या दिवशीपर्यंत, कोअरमध्ये दिसलं नाही तरी इथे अस्वल, वाघ, बिबट्या वगैरे नुकतेच दिसल्याच्या कहाण्या ऐकून आलो होतो. एवढ्या उशिरानंतर काही दिसेल अशी आशा नव्हती. पण जंगल आवडलं होतं त्यामुळे खंतही नव्हती. एकूणच ताडोबा सहल वाघ, बिबटे यांचा उपास करूनच घडणार हे पहिल्याच दिवसापासून वाटायला लागलेलं होतं. आता बाहेरच पडायचं होतं, चालकाने गाडी भरधाव सोडली आणि थेट गेटबाहेर आणून थांबवली. वेळेत गेटबाहेर पडणं हे आत जाण्याइतकंच महत्त्वाचं असतं. 

 

आमची दुसरी गाडी अजून यायची होती. एकच गाडी बाहेर दिसल्यामुळे नक्की किती गाड्या आत आहेत ते माहिती नव्हतं. इतक्यात आमची गाडीही मागून भरधाव आली. तिकडे गेल्या ३ सफरीत कोणालाच वाघ दिसला नव्हता. मुलं पहिल्यांदाच जंगलात आली आहेत तर त्यांना जंगलातला वाघ दिसला तर मजा येईल म्हणून दिसला पाहिजे असं वाटत होतं, पण याही सफारीत कोणाला वाघ दिसल्याचं कळलं नव्हतं.

आम्ही त्यांना काय दिसलं हे विचारायला जाईपर्यंत मागून आणखीन एक गाडी आली, तीच मगाशी बंद पडत असलेली गाडी. आणि त्यातून एक काकू घाईघाईने उतरून ओंकारला 'thank you!' म्हणून एकदा व्हिडिओ दाखवा म्हणल्या. कसला व्हिडिओ ते कळायच्या आतच मी केतकीचा चेहरा बघितला आणि नक्कीच वाघ दिसला आहे हे कळलं. आता त्या काकूंच्या गाडीला वाघ दिसला म्हणून वाईट वाटून घ्यायचं का शेवटी एकदाचा आपल्या गाडीला वाघ दिसला म्हणून आनंद वाटून घ्यायचा जरा गोंधळच उडला :). 

 

अन्वय खूप उत्साहाने 'कसा तो वाघ कुठून आला, कसा दिसला, कुठे चालत गेला, मग अंधार पडल्याने ड्रायव्हर काकांनी मेट्रो आणि विमानापेक्षा कशी जोरात गाडी चालवत आणली' वगैरे किस्सा सांगत होता. त्याचा उत्साह बघूनच मज्जा येत होती. 

केतकीने 'वाघ दिसल्यावर बाकी मुलं काहीतरी निमित्त झाल्याने रडली आणि वाघ बघू का मुलांकडे बघू आणि यांना गप्प कसं करू, त्यांचं रडणं ऐकून वाघ काय करेल' वगैरे काय काय झालं ते सांगितलं. 

'अनिकेत गाडीत असला की वाघ दिसत नाही ' अशा एका ठाम समजाला तडा गेलेला असल्याने, अनिकेतही उत्साहाने किती जवळून वाघ दिसला हे सांगत होता. 

 

ज्या जागी त्यांना वाघ दिसला तिथून सगळेच कधी ना कधी गेले असणार आणि वाघ तिथे निवांत बसला होता हे ऐकून मात्र जरा वाईट वाटलं. नेमकंच आम्ही तिथून जाताना कोणाचंच कसं लक्ष गेलं नाही असं वाटत राहिलंच.

 

ओंकारकडचा व्हिडिओ बघताना अजून नवीन नवीन काय काय ऐकत होतो, 'कसा अर्धा तास तरी वाघ बघत होतो. झरनी नावाच्या वाघिणीचा तो बच्चा होता. गाडी चालू केली की वाघ उठत होता, बंद केली की बसत होता, मग चालायला लागला आणि कुठे गेला कळायच्या आत गाडीसमोर प्रकट झाला, त्यामुळे पुन्हा थोडावेळ गाडी थांबवावी लागली. गाडी मागे घेतल्यावर त्याला रस्ता मोकळा झाला आणि रस्त्यावरून चालत तो वळणावरून चालता झाला' वगैरे अजून तपशील कळले. ते सगळे ऐकून झाल्यावर एक अस्वलही दिसल्याचं कळलं. 

 

एकूण ही सफारी त्यांना चांगलीच लाभलेली होती :). आणि उत्साहाच्या भरात दिवस संपला. 


१९ नोव्हेंबर

 

या सहलीतली शेवटची सफारी कोलारा बफरमध्ये होती. सकाळी ६:३० ला आत गेलो, आशिष गाईड बरोबर होते. हे जंगल कोअरपेक्षा जरा दाट वाटलं. प्रचंड घनदाट बांबूवन आणि बऱ्यापैकी झुडुपे. काही रस्ते एकच गाडी ऐसपैस मावेल एवढेच रुंद, अनेक चौक आणि सगळा भूलभुलैय्या वाटत होता. त्यामुळे हेही जंगल जरी शांतच असलं तरी प्रसन्न होतं. पण प्राणी दिसायला आणखीनच कठीण.

 

दाट जंगलात शिरण्यापूर्वी एक तलाव लागला त्यात चित्रबलाक पक्षी दिसले. 


थोडं पुढे गेल्यावर वाघाचे ठसे दिसले आणि रोमांचक नाट्य सुरू झालं :). पेंचच्या नाट्यमय सफारीनंतर कधीही काहीही दिसू शकतं याचा अनुभव होताच, आजही तसंच काहीसं घडून वाघ दिसेल का अशी उत्सुकता वाटायला लागली. आम्ही माग काढत फिरलो. 

वाटेत शिक्रा, चट्टरी घुबडांची जोडी, पांढरपोटया कोतवाल, बुलबुल, पोपट दिसले. पुन्हा एकदा नर नीलगाय रस्त्यातच येऊन उभा दिसला. मादी भेकर आणि तिचा छोटंसं पिल्लुही दिसलं. 

आता सगळेच आजूबाजूच्या जंगलावर नजर रोखून होतो, एकदम गाईडला बाजूच्या बांबूत मोठ्ठं काहीतरी बसलेलं दिसलं म्हणून गाडी मागे घेतली तर ते एक मोठ्ठं नर सांबर निघालं. त्याला बघून पुढे गेलो. आज अगदीच कमी प्राणी दिसले होते, एकूणच शाकाहारी प्राण्यांची संख्या इतकी कमी कशी काय हे अजूनही न सुटलेलं कोडंच आहे. 

एका रस्त्यावर एक दोन गाड्या रस्त्याची पाहणी करून थांबल्या होत्या. वाघ काही काळापूर्वी तिथून गेल्याच्या खुणा दिसत होत्या. बहुदा डुकराची शिकार करून ती ओढत तो रस्त्यावर येऊन बसला असावा, असं सांगणारे चिखलाचे मोठे डाग लाल मातीच्या रस्त्यावर दिसत होते. बाजूच्या गवतावरून काहीतरी ओढत नेल्याच्याही खुणा होत्या. थोडा वेळ तिथे थांबलो. आतून कॉल्स ऐकू आले पण हालचाल काहीच दिसली नाही. असंच फिरण्यात काही तास गेले. 

 

उत्साहाची जागा आता ग्लानी घ्यायला लागली होती. ऊन वाढल्याने पक्षीही झाडांमध्ये विसाव्यासाठी गेले असावेत. जंगलात निरव शांतता पसरली होती.

 

पुन्हा थोडा वेळ ठसे दिसलेल्या रस्त्यावर, पाणवठ्यांवर फिरून, थोडीफार फुलपाखरं बघून परतीच्या वाटेला लागलो. 

इतकी वर्षानुवर्ष ताडोबात येऊन गेल्यावर ' कित्ती वाघ एकत्र दिसले ', आणि ' काssय फोटो मिळाले आहेत ' वगैरे ऐकलेल्या कथांमधले सगळेच वाघ सुट्टीवर गेले की काय असा विचार मनात येऊन गेला.


गंमत म्हणजे आमची ही शेवटची सफारी संपली, आम्ही पुण्याच्या प्रवासाला निघालो आणि दुसऱ्याच दिवशी कळलं की आम्ही निघाल्यानंतर दुपारच्या सफारीला वाघ आणि काळा बिबट्या,
त्यानंतरच्या सकाळच्या सफारीला माया वाघीण दिसले :). 


प्रत्येक वेळी जंगलातून परत आल्यानंतर 'देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी' अशीच भावना माझ्या मनात येते. खरंतर नुसतंच वाघ बघायला मिळाला पाहिजे असा आमचा अट्टाहास नसतो. आम्ही अगदी मनापासून जंगलात असण्याचा आनंद लुटतो. पण तरीही प्रत्येक वेळी वाघ, बिबटे दिसले नाहीत की हिरमुसलेही होतो. मग जेव्हा असं सगळं आठवून खरंच त्या ३-४ दिवसांत काय काय केलं, काय अनुभवलं याचा गोशवारा तयार होतो तेव्हा निसर्गाने केवढं काय काय दिलंय याचीच जाणीव होते. आणि आणखीन एक समृद्ध जंगल अनुभवायला मिळालं या भावनेने मन तृप्त होतं!


प्राण्या-पक्षांची एकत्रित यादी

पक्षी 

  1. सातभाई / Jungle babbler 
  2. साळुंकी / Common myna 
  3. ब्राह्मणी मैना / Brahminy starling / Brahminy myna
  4. टकाचोर / Rufous treepie 
  5. लालबुड्या बुलबुल / Red vented bulbul 
  6. वेडा राघू / Green bee eater 
  7. नीलपंखी / Indian roller 
  8. कावळा / Crow 
  9. भारद्वाज / सोनकावळा / Crow pheasant / Greater Coucal
  10. पोपट / Plum headed parakeet 
  11. पोपट / Rose ringed parakeet 
  12. चट्टरी वनघुबड / Mottled wood owl 
  13. तुरेबाज व्याध / झेंडोरी गरुड / Crested halk eagle 
  14. मोहोळ घार / Oriental honey buzzard 
  15. तीसा / व्याध / White eyed buzzard
  16. कापशी घार / Black shouldered kite
  17. कोतवाल / Black drongo 
  18. पांढरपोट्या कोतवाल / White bellied drongo 
  19. भृंगराज (कोतवाल) / Greater racket tailed drongo
  20. सुतार / Flameback woodpecker 
  21. धनेश / Indian grey hornbill 
  22. हळद्या / Golden oriole 
  23. हुदहुद्या / हुप्प्या / Hoopoe 
  24. रानकोंबडा / Red Junglefowl
  25. रानकोंबडी / Gray Junglefowl
  26. मोर / Peacock / Indian Peafowl
  27. टिटवी / Lapwing 
  28. चक्रांग बदक / Common teal
  29. अडई बदक / मराल बदक / Lesser whistling duck
  30. वारकरी / चांदवा / Common coot 
  31. पाणकावळा / Little cormorant 
  32. पाणकाड्या बगळा / जांभळा बगळा / Purple heron
  33. वंचक / भुरा बगळा / Indian pond heron
  34. बगळा / Great egret 
  35. गायबगळा / Cattle egret 
  36. खंड्या / White throated kingfisher 
  37. काळा शराटी / काळा कंकर / काळा अवाक / Red naped ibis
  38. कुदळ्या / पांढरा शराटी / पांढरा अवाक / कंकर / Black headed ibis
  39. सातभाई / Jungle babbler
  40. नकल्या खाटीक / Long tailed shrike
  41. थोरला धोबी / White browed wagtail
  42. ठिपकेदार होला / Spotted dove
  43. हरोळी / हिरवा होला / हरियाल / Yellow footed green pigeon
  44. चित्रबलाक / Painted stork
  45. शिक्रा / Shikra
  46. शिंजिर / सूर्यपक्षी / Purple rumped sunbird
  47. पांढऱ्या भुवईची नाचण / White browed fantail 
सस्तन प्राणी 
  1. वाघ / Tiger 
  2. उदमांजर / Black civet 
  3. मुंगूस / Indian grey mongoose
  4. कोल्हा / Jackal 
  5. वानर / Grey Langur 
  6. चितळ / Spotted deer 
  7. सांबर / Sambar deer 
  8. भेकर / Barking deer
  9. नीलगाय / Nilgai
  10. रानससा / Indian hare
  11. गवा / Indian gaur
  12. रानडुक्कर / Wild boar 
  13. खार / Squirrel
  14. मगर / Crocodile
  15. रानकुत्रा / Indian wild dog  

फुलपाखरे

  1. Common crow
  2. Common yellow
  3. Plain tiger
  4. Common lime
  5. Emigrant
  6. Common rose
  7. Commander
  8. Danaid eggfly
  9. Grey pansy
वृक्ष
  1. ऐन / Crocodile bark tree 
  2. मोहा 
  3. भेरा 
  4. मोवई 
  5. साग 
  6. गराडी 
  7. भुत्या / Ghost tree
  8. धावडा 
  9. तेंदू 
  10. जांभूळ

गवत

  1. बांबू / Bamboo
  2. भूतगांज्या

10 comments:

  1. Mastach...khup diwsanni mazhi pan tadoba safari zhali tuzhya lekhamule

    ReplyDelete
  2. खूप छान. मनानी पुन्हा एकदा ताडोबाची सफारी झाली. छान डिटेल लिहिलं आहेस. मस्त sssss

    ReplyDelete
  3. Mast lihilay Himangi. 4 divas tadoba la javun alya sarkhe vatale.

    ReplyDelete
  4. Khup chaan lihila ahe Himangi ����

    ReplyDelete
  5. खूप सुंदर आणि सविस्तर लिहिले आहेस ग...पोरांचे कौतुक आहे आणि तुमचे पण 😊😊

    ReplyDelete
  6. Thank you! Unfortunately I don't see the names of all of the commenters..
    Appreciate the feedback though :)

    ReplyDelete
  7. Bapre Himangi kasla lihilays, muddesud, agdi diwasbharacha purna savistar varnan, parh ani pranavni kadhlele photos ani tu tyacha varnan. grt ahes prani pakshi phulanch varnan... ani vegvegli tyanchi naava. ajun gele nahi me tadobala pan nakki janar!! ashich likhan karat raha all the 👍

    ReplyDelete
  8. व्वा व्वा खूप छान लिहले आहेस .

    ReplyDelete